महत्वाचे, वाशीम

वाशिममध्ये पाणी उपशावर तात्पुरती बंदी; ४१९ तलावांतील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव

|
Published On: October 3, 2026

वाशिम: जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने जलसाठ्यांची स्थिती चिंताजनक बनली आहे. दरवर्षी पावसाळ्यात ८०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यात यंदा आतापर्यंत केवळ ४८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे आगामी काळातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील ४१९ तलावांमधून होणाऱ्या पाणी उपशावर तात्पुरती बंदी घातली आहे.
तलावांमधून पंप, मोटर, इंजिन किंवा पाइपलाइनद्वारे कोणत्याही प्रकारचा पाणी उपसा करण्यास मनाई करण्यात आली आहे. यापूर्वी पाणी उपशासाठी देण्यात आलेले परवानेही तात्पुरत्या कालावधीसाठी रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे परवाना असतानाही पाणी उपसा केल्यास तो अवैध पाणी उपसा मानला जाणार आहे.
तलावांमध्ये उपलब्ध असलेला अत्यल्प पाणीसाठा पिण्यासाठी, जनावरांसाठी तसेच अत्यावश्यक गरजांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. पाण्याचा अनधिकृत उपसा होत असल्याचे आढळून आल्यास तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी जलसंपदा विभाग, ग्रामसेवक आणि पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठा पुढील मान्सूनपर्यंत पुरविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Share News
वाशिम, वाशिम जिल्हा

Leave a Comment