महत्वाचे

समृद्धी महामार्गावरील रास्तारोको आंदोलनाला परवानगी नाकारली; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे वाशिम पोलिसांचे आवाहन

|
Published On: October 28, 2026

वाशिम, दि. २८ ऑक्टोबर : शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३० ऑक्टोबर रोजी समृद्धी महामार्गावर प्रस्तावित रास्तारोको आंदोलनाला वाशिम जिल्हा पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल मीडियावरील अप्रमाणित माहिती व अफवांवर विश्वास न ठेवता जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.शेतकऱ्यांच्या समस्या व विविध मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र, आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. समृद्धी महामार्गावर रास्तारोको केल्यास प्रवासी, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, कामगार तसेच अत्यावश्यक सेवांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय औद्योगिक व कृषी मालाच्या वाहतुकीवर परिणाम होण्याबरोबरच वेगवान वाहतुकीमुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.सार्वजनिक रस्ते अडवून आंदोलन करणे योग्य नसल्याचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने अमित साहनी विरुद्ध पोलीस आयुक्त व इतर या खटल्यातील निर्णयात केल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे नागरिक, शेतकरी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरील अप्रमाणित माहितीच्या आधारे आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.समृद्धी महामार्गावरील वाहतूक रोखणे, नागरिकांना अडथळा निर्माण होईल असे कृत्य करणे किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वर्तन करणे टाळावे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. प्रस्तावित रास्तारोको आंदोलन आयोजित करू नये, त्याला प्रोत्साहन देऊ नये तसेच कोणताही दखलपात्र अथवा अदखलपात्र गुन्हा घडेल असे कृत्य करू नये, असा इशारा देण्यात आला आहे. अशा प्रकारचे कृत्य निदर्शनास आल्यास राष्ट्रीय महामार्ग अधिनियम १९५६, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, भारतीय न्याय संहिता २०२३ आणि लागू असलेल्या अन्य कायद्यांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.नागरिकांनी आपल्या मागण्या मांडण्यासाठी कायदेशीर व शांततापूर्ण मार्गांचा अवलंब करावा. सोशल मीडियावर आक्षेपार्ह, दिशाभूल करणारी किंवा अफवा पसरविणारी माहिती प्रसारित करू नये. कोणतीही अनुचित घटना किंवा संशयास्पद माहिती निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल कटिबद्ध असून, जिल्ह्यात शांतता, सलोखा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
Share News

Leave a Comment