सर्व बातम्या

वाशिममध्ये बनावट देशी-विदेशी दारूचा २.८२ लाखांचा साठा जप्त; तिघांना अटक

|
Published On: October 22, 2026

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

वाशिम : जिल्ह्यात अवैध मद्यविक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. अडोळी ते कुंभारखेड रस्ता तसेच टो शिवारात छापा टाकून पथकाने २ लाख ८२ हजार ६१० रुपये किमतीचा बनावट देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना २३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.अवैधरित्या बनावट विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. जप्त केलेल्या मुद्देमालात रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या १८० मिली क्षमतेच्या ३२९ बाटल्या, इम्पेरियल ब्लू व्हिस्कीच्या १८० मिली क्षमतेच्या १३८ बनावट सीलबंद बाटल्या आणि भिंगरी संत्रा देशी दारूच्या ९० मिली क्षमतेच्या १,००० बाटल्यांचा समावेश आहे. एकूण २० पेट्या मद्यसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती विभागाने दिली.

या प्रकरणी वैभव बबन काकडे (वय २७), अमोल प्रल्हाद काकडे (वय २६) आणि रवी माणिक काकडे (वय ३१), तिघेही रा. टो, ता. जि. वाशिम, यांना अटक करण्यात आली. आरोपींना वाशिम येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली.राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, अमरावती विभागाचे विभागीय उपआयुक्त डॉ. पराग नवलकर आणि प्रभारी अधीक्षक सीमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. भरारी पथकाचे निरीक्षक एम. के. उईके, दुय्यम निरीक्षक एम. एस. जाधव व आर. पी. मनवर यांच्यासह विभागाच्या जवानांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास निरीक्षक मधुकर उईके करीत आहेत. दरम्यान, विनापरवाना मद्याची साठवणूक, वाहतूक किंवा विक्री होत असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाशिम भरारी पथकाला कळवावे, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

Share News

Leave a Comment