वाशिम : देशाच्या सीमेवर २२ वर्षे कर्तव्य बजावून सुखरूप निवृत्त होऊन मायभूमीत परतणे हे प्रत्येक सैनिकासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी भावनिक क्षण असतो. जांभरून जहांगीर येथील श्रीकीसन इंगोले यांनी भारतीय सैन्य दलात तब्बल २२ वर्षे देशसेवा करून ३० सप्टेंबर रोजी निवृत्ती घेतली. त्यांच्या मायभूमीत आगमनाने गावकऱ्यांची छाती अभिमानाने फुलून आली असून विविध ठिकाणी त्यांचा सन्मान केला जात आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!

श्रीकीसन इंगोले हे २००४ मध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाले. सेवाकाळाच्या सुरुवातीला त्यांनी लेह-लडाख आणि जम्मू-काश्मीरसारख्या आव्हानात्मक भागात देशसेवेचे कर्तव्य बजावले. त्यानंतर गुजरात आणि पंजाबच्या सीमावर्ती भागातही त्यांनी जबाबदारी पार पाडली. देशाच्या सीमेचे रक्षण करताना अनेक वर्षे कुटुंबापासून दूर राहून त्यांनी राष्ट्रसेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले.
एका सैनिकाच्या आयुष्यात सुखरूप निवृत्ती होणे म्हणजे पुनर्जन्म मिळाल्यासारखेच मानले जाते. मात्र या प्रवासात केवळ सैनिकाचेच योगदान नसते. सैनिक सीमेवर देशाचे रक्षण करत असताना त्याचे कुटुंब त्याच्या अनुपस्थितीत घर, मुलांचे शिक्षण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत असते. त्यामुळे श्रीकीसन इंगोले यांच्या २२ वर्षांच्या यशस्वी सेवेत त्यांच्या पत्नी आणि मुलांचाही मोठा वाटा आहे.
निवृत्तीनंतर वाशिम रेल्वे स्थानकावर इंगोले यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर जांभरून जहांगीर येथे सवाद्य भव्य शोभायात्रा काढण्यात आली. फुलांची उधळण आणि जयघोषात गावकऱ्यांनी त्यांचा गौरव केला. दरम्यान, विविध ठिकाणी त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांचा आणि कुटुंबीयांचा सत्कार करण्यात येत आहे. २२ वर्षे देशसेवेला समर्पित केलेल्या या सैनिकाच्या कार्याला गावकऱ्यांनी मनापासून सलाम केला.