वाशिम
Thank you for reading this post, don't forget to subscribe!वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर गांजा तस्करीचा मोठा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी तस्करांनी वाहनाच्या कॅबिनमध्ये खास गुप्त कप्पा तयार करून त्यामध्ये तब्बल ३५० किलो गांजा लपवला होता. मात्र, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीमुळे तस्करांचा हा प्लॅन फसला असून, जवळपास २ कोटी किमतीचा गांजा पोलिसांच्या हाती लागला आहे.
छत्तीसगडमधून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वाशिम पोलिसांनी ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखा, कारंजा पोलीस, मालेगाव पोलीस आणि जिल्हा वाहतूक पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे समृद्धी महामार्गावर संशयित वाहनांवर लक्ष ठेवत तपासणी सुरू केली.
याचदरम्यान संशयित वाहन पोलिसांच्या रडारवर आले. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता सुरुवातीला गांजा सहजपणे दिसून येत नव्हता. मात्र, पोलिसांनी वाहनाच्या कॅबिनची बारकाईने तपासणी केली असता त्यामध्ये खास पद्धतीने तयार करण्यात आलेला गुप्त कप्पा आढळून आला.
या छुप्या जागेत गांजाची पोती लपवण्यात आली होती. पोलिसांनी हा गुप्त कप्पा उघडताच तब्बल ३५० किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा जप्त करत दोन वाहने ताब्यात घेतली असून, संबंधित आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
या गांजाची अंदाजे किंमत जवळपास २ कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
दरम्यान, हा गांजा नेमका कुठून आणण्यात आला होता आणि तो कुठे पोहोचवला जाणार होता, याचा तपास आता सुरू आहे. तसेच या तस्करीमागे आणखी कोणकोणत्या व्यक्तींचा सहभाग आहे, या तस्करीचे नेटवर्क किती मोठे आहे आणि यामागे कोण मास्टरमाइंड आहे, याचाही पोलीस शोध घेत आहेत.
विशेष म्हणजे, पोलिसांना चकवा देण्यासाठी वाहनाच्या कॅबिनमध्ये गुप्त कप्पा तयार करून गांजा वाहून नेण्याची पद्धत वापरण्यात आली होती. त्यामुळे या तस्करीमागे नियोजनबद्ध आणि आंतरराज्यीय नेटवर्क असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.
या संपूर्ण कारवाईबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी माहिती दिली असून, पुढील तपासातून या तस्करीचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात, हे स्पष्ट होणार आहे.