सर्व बातम्या

शेकडो महिलांना दुचाकी शिकवणारी कारंजाची ‘नवदुर्गा’ शिवनंदा देशमुख

|
Published On: October 17, 2026

कारंजा लाड, नवरात्र उत्सवात आपण देवीच्या शक्तिरूपांची आराधना करतो; मात्र महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवून त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या महिलाही समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. कारंजा लाड येथील सरनाईक मोटर्स ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका शिवनंदा विनोद देशमुख या त्यापैकीच एक आहेत. शेकडो महिलांना दुचाकी चालविण्याचे प्रशिक्षण देतानाच चारचाकी वाहन चालविण्यासाठीही मार्गदर्शन करणाऱ्या शिवनंदा देशमुख यांनी महिला सक्षमीकरणासोबत रस्ते सुरक्षेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.आजच्या धावपळीच्या जीवनात दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालविता येणे महिलांसाठी केवळ सोय नसून स्वावलंबनाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. मुलांना शाळेत नेणे, नोकरी किंवा व्यवसायासाठी वेळेत पोहोचणे, दैनंदिन कामे पूर्ण करणे अथवा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात जाणे अशा अनेक प्रसंगी वाहन चालविण्याचे कौशल्य उपयोगी पडते. मात्र, वाहतुकीची गर्दी, अपघाताची भीती आणि वाहनावरील नियंत्रणाबाबतची चिंता यामुळे अनेक महिला वाहन शिकण्यास संकोच करतात. अशा महिलांना संयमाने प्रशिक्षण देऊन त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचे काम शिवनंदा देशमुख करतात.गेल्या पाच वर्षांत जवळपास दीड हजार महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, १८ वर्षांच्या तरुणींपासून ते ७० वर्षांच्या ज्येष्ठ महिलांपर्यंत विविध वयोगटांतील महिलांनी त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. वय हा शिकण्यातील अडथळा नसून इच्छाशक्ती, योग्य मार्गदर्शन आणि नियमित सराव यांच्या बळावर नवीन कौशल्य आत्मसात करता येते, हा संदेश त्यांच्या कार्यातून मिळतो.महिला सक्षमीकरणासोबत रोड सेफ्टीचा जागरवाहन चालविण्याचे कौशल्य आत्मसात करण्याबरोबरच सुरक्षिततेचे भान असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वाहतूक चिन्हांची माहिती, वेगावर नियंत्रण, सुरक्षित अंतर राखणे, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर, चारचाकी चालविताना सीटबेल्ट लावणे आणि वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे या बाबी प्रत्येक वाहनचालकाने पाळणे आवश्यक आहे.सास रोड सेफ्टी अभियान, कारंजाचे व्यवस्थापक श्याम सवाई यांनीही शिवनंदा देशमुख यांच्या कार्याचे कौतुक केले. महिलांना वाहन चालविण्यासाठी प्रोत्साहित करताना त्यांच्या मनातील भीती दूर करणे, योग्य प्रशिक्षण देणे आणि सुरक्षित वाहनचालक होण्याची जाणीव निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनी स्वावलंबी होण्याबरोबरच स्वतःची, सहप्रवाशांची आणि रस्त्यावरील इतर नागरिकांची सुरक्षितताही जपली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.नवरात्रात देवीच्या शक्तीची आराधना करताना समाजातील महिलांना स्वतःचे सामर्थ्य ओळखण्याची संधी देणे, त्यांच्या मनातील भीती दूर करणे आणि त्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी सक्षम करणे, हीदेखील स्त्रीशक्तीची खरी आराधना आहे. शिवनंदा देशमुख यांचे कार्य याच विचाराची प्रचिती देते.महिलांच्या हातात स्टेअरिंग, मनात आत्मविश्वास आणि प्रवासात सुरक्षिततेचे भान निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न महिला सक्षमीकरणाला नवी दिशा देणारा आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेकडो महिलांना वाहन चालविण्याचे कौशल्य शिकविणाऱ्या शिवनंदा देशमुख यांना कारंजाची ‘नवदुर्गा’ म्हणणे सार्थ ठरते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
Share News

Leave a Comment