वाशिम : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांसाठी ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ योजनेअंतर्गत चार व सात दिवसांचे प्रवास पास ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे प्रवाशांना पास काढण्यासाठी आगारात प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता राहणार नसून अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने पास काढता येणार आहे. याबाबत अकोला विभाग नियंत्रक स्मिता सूतवने यांनी माहिती दिली.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने २७ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार आगारातून हस्तलिखित पद्धतीने देण्यात येणारे पास अधिक सुलभ व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आवश्यक माहिती भरून नियमानुसार ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ ऑनलाइन काढता येणार आहे.
ऑनलाइन पद्धतीने मिळालेला पास प्रिंट स्वरूपात किंवा प्रवाशाच्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपात सादर करता येणार असून तो वैध मानला जाणार आहे. या पासवर असलेला QR कोड वाहकाकडून ईटीआयएम मशीनद्वारे स्कॅन करण्यात येईल. QR कोड स्कॅन केल्यानंतर प्रवाशाचे नाव, पासचा प्रकार तसेच पासची वैधता यासह संबंधित माहिती ईटीआयएम मशीनवर उपलब्ध होईल. त्यानंतर प्रवाशाच्या वैध ओळखपत्राची पडताळणी करून पात्र प्रवाशाला प्रवासाची अनुमती देण्यात येणार आहे.
QR कोड स्कॅन न झाल्यास प्रवाशांनी ०८०६९०३२७३२ किंवा ०८०६९०३२७३७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून पडताळणी करावी, असे सूचित करण्यात आले आहे.
या ऑनलाइन सुविधेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून, प्रवासाचे नियोजन अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. आगार व विभागीय पातळीवर अधिकारी, कर्मचारी तसेच प्रवाशांना या सुविधेची माहिती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या अधिकृत ऑनलाइन प्रणालीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक स्मिता सूतवने यांनी केले आहे.