वाशीम: सोयाबीनचे प्रमुख उत्पादन क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशीम जिल्ह्यात आता शेतकरी पारंपरिक पिकांना पर्याय शोधताना दिसत आहेत. हवामानातील बदल, अनियमित पाऊस आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे सोयाबीन शेती अडचणीत आली असताना खरोळा येथील युवा शेतकरी विष्णू ठाकरे यांनी ‘इराणी अकरकरा’ या औषधी वनस्पतीची लागवड करून वेगळा प्रयोग केला आहे. वाशीमच्या कृषी क्षेत्रातील हा प्रयोग सध्या यशस्वी ठरत असून त्यातून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा निर्माण झाली आहे.

विष्णू ठाकरे यांनी आपल्या एक एकर शेतात जुलै महिन्यात अकरकरा पिकाची लागवड केली. इराणमधून आलेल्या या औषधी वनस्पतीच्या फुलांना औषधनिर्मिती उद्योगात मागणी असल्याने बाजारपेठेत चांगला दर मिळत आहे. सध्या पिकाच्या पहिल्या बहराची तोडणी सुरू असून लाल-पिवळ्या फुलांनी शेत बहरून गेले आहे.
तोडणी केलेली फुले काही दिवस सुकवून विक्रीसाठी पाठविली जातात. एका एकरातून ९ ते १० क्विंटल उत्पादन अपेक्षित असून सध्या २५ ते ३० हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे लागवड खर्च वजा केल्यानंतर एक एकरातून तीन ते चार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
खरोळा गावातील आणखी दोन शेतकऱ्यांनीही अकरकराची लागवड केली आहे. या पिकाची विक्री मध्य प्रदेशातील नीमच बाजारपेठेत केली जात आहे. सहाय्यक कृषी अधिकारी राजेश इंगळे आणि महादेव सोळंके यांच्या मार्गदर्शनातून हा प्रयोग करण्यात आला.

विशेष म्हणजे अकरकरा पिकासाठी फवारणी आणि मशागतीचा खर्च अत्यल्प आहे. तसेच वन्यप्राण्यांपासून या पिकाला तुलनेने कमी धोका असल्याने शेतकऱ्यांसाठी हा एक फायदेशीर पर्याय ठरू शकतो अशी माहिती सहाय्यक कृषी अधिकारी राजेश इंगळे यांनी दिली.
हवामान बदलाच्या काळात पारंपरिक पिकांवरील अवलंबित्व कमी करून औषधी वनस्पतींसारख्या पर्यायी पिकांकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे. खरोळ्यातील विष्णू ठाकरे यांचा प्रयोग कमी क्षेत्रात, कमी खर्चात आणि अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या शेतीचा नवा मार्ग दाखवणारा ठरत आहे. त्यामुळे अकरकरा पिकाचा प्रयोग वाशीम जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.