वाशिम : संत्रा बाग उभी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक वर्षे मेहनत घ्यावी लागते. झाडांची निगा राखणे, खते, औषधे आणि पाण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. मात्र, यंदाच्या अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर संत्रा बागा वाचविण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. तांदळी शेवई येथील शेतकरी मोतीराम शिंदे यांची सहा वर्षांची संत्रा बाग पाण्याअभावी सुकू लागल्याने त्यांची चिंता वाढली आहे.जिल्ह्यात खरीप हंगामातील बहुतांश पिकांचे नुकसान झाले असताना आता फळबागाही संकटात सापडल्या आहेत. संत्रा झाडांना वेळेत पाणी मिळाले नाही, तर बागेचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीतून उभी केलेली बाग डोळ्यांदेखत सुकत असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकटही निर्माण होण्याची शक्यता आहे.दरम्यान, धरणात आणि जलाशयांमध्ये उपलब्ध असलेला जलसाठा राखून ठेवण्यासाठी सिंचनासाठी पाणी उपसा बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांना बागांना पाणी देण्यात अडचणी येत आहेत. धरणात पाणी उपलब्ध असतानाही वीजपुरवठा बंद असल्यामुळे सिंचन करता येत नसल्याची परिस्थिती तांदळी शेवई परिसरात निर्माण झाली आहे.एकीकडे खरीप पिकांचे नुकसान आणि दुसरीकडे फळबागा सुकण्याचे संकट अशा दुहेरी कोंडीत शेतकरी सापडले आहेत. त्यामुळे संत्रा बागा जगविण्यापुरते तरी धरण किंवा जलाशयातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे आणि त्यासाठी आवश्यक परवानगी द्यावी, अशी मागणी तांदळी शेवई परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. आता प्रशासन शेतकऱ्यांच्या या मागणीबाबत काय निर्णय घेते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
